“सन्मान लेकीचा” “सोहळा जागतिक महिला दिनाचा ”
भिवापूर तालुक्यातील आलेसुर तेथे दिनांक 12 मार्च 2025 रोज बुधवार ला “सन्मान लेकीचा” “सोहळा जागतिक महिला दिनाचा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आलेसुर येथील माजी विद्यार्थिनी कुमारी योगीना दादाराव नन्नावरे हिचा “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” 2023 ग्रुप “बी” या परीक्षेत उत्तुंग भरारी घेत मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता . त्यातच आलेसुरच्या कन्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नागपूर येथील कुमारी माधुरी शंकर गायकवाड यांनी गडचिरोली नक्षलग्रस्त भागात केलेले पोलीस प्रशासनातील उत्तम कार्य तसेच पोलीस स्टेशन भिवापूर येथील पोलीस उपनिरीक्षक सुरेखा रमेश बिडगर यांचे सुद्धा पोलीस प्रशासनातील उत्तम कार्य लक्षात घेता.या दोन्ही महिला पोलीस अधिकारी यांचा “समाजभूषण” म्हणून सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाचे उदघाटक कारगाव सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर दडमल, कार्यक्रमाचे अध्यक्ष आलेसुरचे सरपंच दिलीप दोडके , या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्याध्यक्ष तथा नांद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष नन्नावरे, नांद येथील सरपंच शितल राजूरकर, ग्रामपंचायत सदस्य मंदाताई ढोके, विलास रुईकर राकेश आत्राम, तसेच घरत मॅडम, कुंदा घोडमारे, रसराज राजनहिरे बापूराव गायकवाड,अतुल राजनहिरे, अनिल गायकवाड अंकेश गायकवाड आलेसूर जांभूळविहिरा,वणी, खोलदोडा, नांद व धोंडगाव या गावातील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतातील ज्या ज्या थोर,महिला समाजसेविकांनी महान कार्य केले त्यांच्या या कार्यांच्या सन्मानार्थ व अधिकारी पदी कु.योगिना दादाराव नन्नावरे हिची नियुक्ती झाल्याबद्दल गावातून लेझीम नृत्याद्वारे आलेसुर व बाहेरगावातील शेकडो नागरिकांच्या उपस्थित मिरवणूक काढण्यात आली. प्रशासनात दरवर्षी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदाचा प्रमाण अत्यंत मोजकं आहे. परंतु या पदासाठी तयारी करणारे तसेच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. आणि त्या लाखातून एक आपण आहोत.
त्याकरिता स्वतःमध्ये विश्वास, जिद्द, चिकाटी व सातत्य टिकून ठेवण्याची क्षमता उरात बाळगली तर यश संपादन करता येतं. इत्यादी मनोगत सत्कारमूर्ती सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमारी माधुरी गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर दडमल यांनी व्यक्त केले. जन्मलेल्या प्रत्येक बालकांमध्ये कोणत्या ना कोणत्या एका गोष्टीसाठी विशिष्ट अशी बुद्धिमत्ता असते. आपल्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आपल्यालाच कळलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा मध्ये जरी अपयश आलं तरी इतर क्षेत्र आपली वाट बघत आहे याची जाणीव सुद्धा स्वतःला असायला पाहिजे. इत्यादी मार्गदर्शन सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक सुरेखा बिडगर यांनी केले. सारासार विचार न करता घेतलेले निर्णय व लवकरात लवकर यश मिळवण्याच्या नादात स्वतःच मानसिक संतुलन बिघडून घेणे हे सुद्धा अपयशाचं कारण असते. त्याकरिता नियोजनबद्ध अभ्यास, स्वतःसाठीच दिलेला मी वेळ, व मला वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शक तसेच माझे आई- वडील, मार्गदर्शक शिक्षक सुभाष नन्नावरे या सर्वांच्या सहकार्याने आणि माझ्या अभ्यासातील सातत्य यामुळे या सहाय्यक कक्ष अधिकारी या पदापर्यंत पोहोचू शकली इत्यादी मनोगत कुमारी योगिना नन्नावरे हिने व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल ढोक यांनी केले. तर आभार प्रदर्शन कुमारी आरती गायकवाड हिने मानले.