14.7 C
New York
Monday, March 31, 2025

Buy now

गडचिरोलीच्या जीवनगट्टा गावाला जेव्हा प्रणाली नवी ओळख देते! ▪️आंबा मिलेट धान्य महोत्सवाला नागपुरकरांचा उदंड प्रतिसाद ▪️महिला उत्पादकांचा हिरिरीने पुढाकार

गडचिरोलीच्या जीवनगट्टा गावाला जेव्हा प्रणाली नवी ओळख देते!

▪️आंबा मिलेट धान्य महोत्सवाला नागपुरकरांचा उदंड प्रतिसाद
▪️महिला उत्पादकांचा हिरिरीने पुढाकार

नागपूर, कोकणातल्या देवगडच्या हापूस आंब्यापासून ते थेट गडचिरोली जिल्ह्यातील जीवनगट्टा गावच्या ‘गोला’ या देशी आंब्यापर्यंत, खान्देशच्या ज्वारीच्या लाह्यापासून वर्धा नागपूर जिल्ह्यातील केसर, दशेरी ते सफेदापर्यंतची वैविधता ही ‘आंबा मिलेट धान्य महोत्सवाचे’ वैशिष्टय ठरले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने येथील कुसूमताई वानखेडे भवन येथे दिनांक 16 पासून सुरू झालेल्या आंबा मिलेट धान्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

गडचिरोलीच्या जीवनगट्टा गावातील कृषी पदवी संपादन करणाऱ्या प्रणाली गावडे हिने आपल्या कौशल्यावर वैविध्यपूर्ण आंबाडी, टोमॅटो, लसून लोणच्यासह गावातील देशी गोला आंब्याला हापूसच्या रांगेत आत्मविश्वासाने बसविले आहे.
“माझ्या गावची मी पहिलीच महिला कृषी पदविधारक होत आहे. आईने स्थापन केलेल्या आदिवासी महिला बचत गटाला आता कृषी शिक्षणाची जोड देवून मूल्यवृद्धी कशी करता येईल याचा मी प्रयत्न करीत आहे. आदिवासी महिलांकडून पारंपारिक चालत आलेल्या कौशल्यावर आधारित अन्न प्रक्रियेला आता थोडे शास्त्रोक्त प्रक्रियेची जोड देऊन नैसर्गिक स्वरुपातच आंबाडी, टोमॅटो यांचे लोणचे, आवळा प्रक्रिया केलेले सिरप, मॅंगो ज्यूस असे मोजके उत्पादने घेऊन स्टॉल घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रणाली गावडे हिने दिली. या उपक्रमातून एक नवा आत्मविश्वास मी अनुभवत असून तो आमच्या जीवनगट्टा मधील इतर महिलांपर्यंत घेऊन जाईल असा विश्वास प्रणालीने दाखविला. रानभाज्यांसह इतर उत्पादने तिने विक्रीला ठेवली आहेत.

या महोत्सवात एकूण 57 स्टॉल्स आहेत. यातील 25 स्टॉल्स आंब्याचे आहेत व 32 स्टॉल्स मिलेट धान्य पदार्थाचे आहेत. वरुडच्या प्रशांत वेखंडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकविलेले दशेरी, लड्डू, लंगडा, सफेदा, चौसा ही नैसर्गिकरित्या पिकविलेले आंबे विक्रीस ठेवले आहेत. अनेक महिलांनी आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहेत. ज्वारी बाजरी, नाचनी, वरई, राळा आदि मिलेट धान्यापासून तयार केलेले विविध प्रकार, बिस्किट, पापड, हळद, गावरान तेजा मिरची व लोणचे या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत. हा महोत्सव नॉर्थ अंबाझरी मार्गावरील कुसूमताई वानखेडे सभागृह येथे 19 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सर्वांसाठी खूला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!