
नागपुरात २८ व २९ नोव्हेंबरला जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स फेडरेशनची १७ वी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या आर्थिक स्थितीबाबत पेन्शनधारकांची चिंता; कंपन्यांच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन
जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स ऑल इंडिया फेडरेशन (GIPAIF) ची १७ वी अखिल भारतीय कार्यकारिणी बैठक २८ व २९ नोव्हेंबर रोजी नागपुरातील व्हानामती केंद्र, व्हीआयपी रोड, धरमपेठ येथे आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय बैठकीत देशभरातील १०० हून अधिक कार्यकारिणी सदस्य सहभागी होणार आहेत. बैठकीचे औपचारिक उद्घाटन २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ऑल इंडिया बँक पेन्शनर्स अँड रिटायरीज कॉन्फेडरेशन (AIBPARC), नवी दिल्लीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. जय देव शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या भवितव्यावर चर्चा या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या तीन सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांच्या भवितव्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने (Parliamentary Standing Committee on Public Accounts) सादर केलेल्या अहवालावरही यावेळी चर्चा होणार आहे. या समितीचे अध्यक्ष खासदार बैजयंत पांडा आहेत. नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांची बाजारातील प्रीमियम हिस्सेदारी सातत्याने घटत असल्याबाबत पेन्शनधारकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या कंपन्यांचे सॉल्व्हन्सी मार्जिन अर्थात आर्थिक दायित्वे पूर्ण करण्याची क्षमता निर्धारित वैधानिक मर्यादेपेक्षा कमी असल्याचे फेडरेशनने नमूद केले आहे. भांडवल उपलब्धतेचा अभाव आणि व्यवस्थापनातील आव्हाने – काही वर्षांपूर्वी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत्या. त्या नफा कमवत होत्या आणि केंद्र सरकारला नियमित लाभांशही देत होत्या. मात्र, कंपन्यांची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देण्यात आले नाही, तसेच भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत घसरण झाल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे.
दीर्घकालीन अस्तित्वासाठी ठोस धोरणाचा अभाव, पुरेशा कर्मचारी भरतीचा अभाव, खासगी कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा धीमा अवलंब आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढती निराशा यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. खासगीकरणाच्या धोरणांना विरोध -महत्त्वाच्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या हिताला बाधा आणून खासगी कॉर्पोरेट संस्थांना प्राधान्य देणाऱ्या आर्थिक धोरणांना फेडरेशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे संरक्षण आणि त्यांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे फेडरेशनचे मत आहे.
आयडीबीआय बँकेच्या संदर्भात सुरू असलेल्या विक्री प्रक्रियेवरही फेडरेशनने आक्षेप व्यक्त केला आहे. परदेशी वित्तीय संस्थेला बँकेची विक्री करण्याच्या प्रक्रियेत, खरेदीदाराला त्याच बँकेकडून कर्ज घेऊन अधिग्रहणासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावित व्यवस्थेबाबत फेडरेशनने अन्यायकारक व्यवहार असल्याची भूमिका मांडली आहे. अशा धोरणांना ठामपणे विरोध करण्याची गरज असल्याचेही फेडरेशनने म्हटले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे अस्तित्व, आर्थिक स्थैर्य आणि कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी देशभरातील पेन्शनधारकांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी मंचावरील उपस्थित अ.भा.उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी, अध्यक्ष विजय थूल, सचिव अविनाश पुलतामकर, संघटन सचिव प्रदीप अवचट आणि विवेक भालेकर उपाध्यक्ष यांची उपस्थिती होती.





