
धापेवाड्यात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली! पाईपचे काम कासवगतीने, ३९(१) ची चौकशी रखडली, आता थेट उच्च न्यायालयात दाद मागणार
विदर्भ नंदन वृत्तसेवा
धापेवाडा (खु.) : जल जीवन मिशन अंतर्गत धापेवाडा (खु.) गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. रस्ते खोदून ठेवले आहेत, पाईप उघड्यावर पडले आहेत, मात्र गावाला आजही नियमित पाणी मिळत नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
१००% चा खोटा दावा उघड :
ग्रामपंचायत सदस्य दिवाकर वसंता कडू यांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्र. ४९४०/२०२६ वर मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी दि. २९.०६.२०२६ रोजी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त, नागपूर यांनी दि. ०३.०९.२०२६ रोजी आदेश क्र. विशा/तक्रार/क/अ/कावि/१७१/२०२६ पारित केला.
या चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली की, योजना १००% पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. प्रत्यक्षात वितरण व्यवस्था फक्त ७३.३४% आणि मंजूर १६५३ घरांपैकी फक्त ६६३ म्हणजे ३७.९५% घरांनाच नळ जोडणी झाली आहे. तसेच काम पूर्ण होण्याच्या ३ महिने आधीच पाणीपुरवठा सुरू झाल्याची नोंद आढळली.
आयुक्तांनी दिले होते ३ महिन्याचे आदेश :
आयुक्तांनी योजना मंजूर अंशजपत्रकाप्रमाणे ३ महिन्यात गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्याचे, १००% नळ जोडणी केल्याशिवाय योजना ग्रामपंचायतीस हस्तांतरित न करण्याचे, तसेच कामात दुर्लक्ष करणाऱ्या उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, Third Party Inspection आणि PMC वर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत या आदेशाची योग्य अंमलबजावणी झालेली नाही.
३९(१) ची चौकशीही थंडबस्त्यात :
याच प्रकरणात अपर विभागीय आयुक्त, नागपूर यांनी दि. ३०.०९.२०२६ रोजी प्रकरण क्र. ४०/२०२६-२७ मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९(१) अंतर्गत चौकशी करून १ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर यांना दिले होते. गट विकास अधिकारी, कळमेश्वर यांनी दि. १२.१०.२०२६ पर्यंत अनुपालन अहवाल द्यायचा होता. मात्र आजपर्यंत या विषयात कोणतीही ठोस कारवाई हाताळण्यात आलेली नाही.
“आम्ही न्यायालयात लढलो, आयुक्तांकडून आदेश मिळवले. तरीही जर अधिकारी आदेश पाळत नसतील, तर हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे. गावाला पाणी मिळावे हीच आमची मागणी आहे. अधिकाऱ्यांनी यापुढेही योग्य पद्धतीने कार्यवाही न केल्यास, संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करून कारवाईची मागणी करू. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.”
दिवाकर वसंता कडू, ग्रामपंचायत सदस्य धापेवाडा




