माथनी येथे राष्ट्रीय बळीराजा महोत्सव संपन्न
मौदा (जि. नागपूर) : बळीप्रतिपदेनिमित्त मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी बळीराजा महोत्सव समिती, मौडा यांच्या वतीने माथनी येथे भारतीय सिंधू-कृषी संस्कृतीचे महानायक महात्मा बळीराजा यांचा राष्ट्रीय महोत्सव व अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात प्रकाश शंभरकर यांनी बळीराजा यांच्या इतिहासावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच जगदीश वाडिभस्मे यांनीही बळीराजा यांच्या कार्याविषयी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले.
‘इडा-पीडा टळो, बळीचे राज्य येवो!’ या घोषवाक्यातून व्यक्त होणारी बळीराजाच्या पुनरागमनाची अपेक्षा आजही भारतीय समाजाच्या मनात जिवंत आहे. सुमारे ३५०० ते ५००० वर्षांपूर्वीच्या सिंधू-कृषी सभ्यतेचा महानायक म्हणून बळीराजा यांच्याकडे पाहिले जाते. समतावादी, प्रजाहितदक्ष, महादानशूर आणि लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांची ओळख आहे. ‘माझी प्रजा, अन्नदाता सुखी भव:’ हा विचार जपत प्रजेच्या सुखाची काळजी घेणारा, प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ समान प्रमाणात मिळावे, यासाठी प्रयत्नशील असणारा संविभागी नेता म्हणजे बळीराजा, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
बळीराजाच्या राज्यात नऊ खंड होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला ‘खंडोबा’ असे संबोधले जात असे. तसेच भैरोबा, विरोबा, काळभैरव, ज्योतिबा, म्हसोबा, मल्हारी, मार्तंड आणि भराडी आदी पदाधिकारी व अधिकारी राज्यव्यवस्थेत कार्यरत होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमिला वाडिभस्मे, महेंद्रपाल खोब्रागडे, रूपेश वाडिभस्मे, राजेंद्र भीमटे, विवेक वाडिभस्मे, लीलाधर नंदनवार, रुपाली वाडिभस्मे यांच्यासह शरवील, मितांश आणि रियांश उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




