आवळगाव शाळेत गांधी–शास्त्री जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानातून दिला आदर्श संदेश
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी – सुरज सुर्यवंशी) :
दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आवळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. पिलारे मॅडम यांनी केले. यावेळी सुमारे तीस विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. इयत्ता ७ वीच्या विद्यार्थिनींनी “हे काम माझे नाही” या विषयावर मूल्यवर्धनात्मक लघुनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शाळेचे पदविधर शिक्षक दोनोडे सर यांनी सादर केलेल्या सुरेल गीताने वातावरण भारावून गेले, तर इयत्ता ५ वीच्या विद्यार्थिनींनी भजन सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. चनोळे सर यांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तिवाडे सर यांनी महापुरुषांच्या कार्यातून आदर्श घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावात स्वच्छता अभियान राबवून प्रत्यक्ष कृतीतून स्वावलंबन व सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला. या स्तुत्य उपक्रमाचे गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.




