नागपुरात पोलिसांची कारवाई : अवैध दारू विक्रीवर धडक, दोन आरोपींवर गुन्हे दाखल
नागपूर (प्रतिनिधी) : शहरात अवैध दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवार (दि. 14 सप्टेंबर 2026) रोजी रात्री पेट्रोलिंगदरम्यान पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथक प्रमुख एपीआय भगवान कोळी यांना माहिती मिळाली की वाडी पोलीस ठाणे हद्दीतील सोनवा नगर खडका रोड परिसरात महादेव उर्फ मोगली लिंगाजी कनुर हा इसम अवैधरित्या देशी दारू विक्री करत आहे. यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून घराची झडती घेतली असता देवघराच्या ठिकाणी गुप्तपणे तयार केलेल्या जागेतून देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच विक्रीची रोकडही हस्तगत करण्यात आली. एकूण सुमारे ७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
विशेष म्हणजे संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. तरीही तो अवैध दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम २२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीतील मोठा ताजबाग परिसरात केजीएन पानशॉपवर छापा टाकण्यात आला. येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व इतर पदार्थांची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत सुमारे ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी व त्यांच्या पथकाने केली.




