डहाळी गावात बैलपोळा उत्साहात साजरा; पारंपरिक दोह्यांनी रंगली सांस्कृतिक मेजवानी
मौदा (प्रतिनिधी):
पंचायत समिती मौदा अंतर्गत येणाऱ्या नानादेवी गट ग्रामपंचायत अंतर्गत डहाळी गावात बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील नागरिकांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सणाचा आनंद लुटला.
यावेळी श्री. राजेंद्रजी वासनिक, ग्रामपंचायत सदस्य श्री. अनिलजी वासनिक, आर्यन वासनिक, अमोल बावने, विनोदजी बावने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बैलजोडीची पूजा श्री. जयपालजी वासनिक यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान पारंपरिक पोळा सणाचे दोहे सादर करण्यात आले, ज्यामुळे वातावरण अधिकच रंगले.
गावातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, विदर्भ नंदन वृत्तपत्राचे संपादक मा. योगेश बावने यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून सणाची शोभा वाढवली.
राजेंद्रजी वासनिक यांच्या मालकीची आकर्षक सजावटीने नटलेली बैलजोडी हे या वर्षीच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. ढोल-ताशांच्या गजरात बैलजोडीची गावभर मिरवणूक काढण्यात आली.
परंपरेनुसार गावकऱ्यांनी बैलांची पूजा करून त्यांना मानाचा मुजरा केला. एकूणच, डहाळी गावात बैलपोळा सण उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा झाला.




