पाच बकऱ्या चोरीला; वयोवृद्ध दाम्पत्यावर उपासमारीची वेळ
एक लाख रुपयांचे नुकसान; ठाणेदार मांडवधारे यांच्याकडून चोरट्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाईचे आश्वासन
कन्हान : कन्हान शहरातील सुपर टाऊन परिसरात राहणारे वयोवृद्ध हौसालाल पुंड हे पत्नीसमवेत वास्तव्यास असून बकऱ्या चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, त्यांच्या घरालगतच्या गोठ्यातील तब्बल पाच बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. चोरी झालेल्या बकऱ्यांची अंदाजे किंमत एक लाख रुपये असून, या घटनेमुळे वयोवृद्ध दाम्पत्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
हौसालाल पुंड यांचा मुलगा कळमेश्वर येथे पत्नीसमवेत राहतो. त्यामुळे वृद्ध दाम्पत्य बकऱ्या चारून मिळणाऱ्या उत्पन्नावर कसाबसा उदरनिर्वाह करीत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या गोठ्यातून पाच बकऱ्या चोरीला गेल्याने त्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. या घटनेची माहिती देताना हौसालाल पुंड यांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, हौसालाल पुंड यांनी कन्हान पोलीस ठाण्यात बकरी चोरीची तक्रार दाखल केली. यावेळी ठाणेदार मांडवधारे यांनी तक्रारीची दखल घेत वयोवृद्ध कुटुंबाला धीर देत, “सबुरी बाळगा, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.
या प्रकरणी चंद्रभान चकोले, संतोष दहीफलकर, संदीप पोकळे तसेच हौसालाल पुंड यांनी प्रसिद्ध समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांच्याकडे मदतीची मागणी केली. मसार यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले असून, चोरीच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
वयोवृद्ध कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, चोरीला गेलेल्या बकऱ्यांचा तातडीने शोध घेऊन संबंधित चोरट्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रभान चकोले, संतोष दहीफलकर, संदीप पोकळे, प्रशांत बाजीराव मसार व हौसालाल पुंड यांनी केली आहे.




