
झाडीपट्टी रंगभूमीवरही दुष्काळाचे सावट!
शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा नाट्यसंस्कृतीला फटका; नाट्यप्रयोगांकडे प्रेक्षकांची पाठ
देसाईगंज (वडसा) गडचिरोली
विशेष प्रतिनिधी :रियाज़ुल शब्बीर शेख
तालुका प्रतिनिधी
विदर्भातील ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवर यंदा आर्थिक संकटाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिणामांची झळ आता या समृद्ध नाट्यपरंपरेलाही बसू लागली आहे. ग्रामीण भागातील आर्थिक विवंचनेमुळे नाट्यप्रयोगांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
झाडीपट्टी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेला ग्रामीण प्रेक्षकांचा नेहमीच भक्कम आधार लाभला आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक हाच या रंगभूमीचा खरा रसिकवर्ग आहे. मात्र, शेतीसमोरील संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि हातात उपलब्ध असलेल्या पैशांची कमतरता यांमुळे नागरिकांना मनोरंजनासाठी खर्च करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. नाटक पाहण्याची मनापासून इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळे अनेक रसिकांना नाट्यप्रयोगांकडे पाठ फिरवावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याचा थेट परिणाम नाट्यप्रयोगांच्या उपस्थितीवर होत असून, नाट्यसंस्था, आयोजक आणि कलावंतांसमोरही आर्थिक आव्हाने उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रंगमंचावर कलाकार आपली कला सादर करीत असतात; मात्र त्या कलेला दाद देणारा प्रेक्षकवर्गच आर्थिक विवंचनेत सापडला, तर रंगभूमीच्या वाटचालीवर त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे.
झाडीपट्टी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ती ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेची जिवंत ओळख आहे. या रंगभूमीने अनेक कलाकारांना व्यासपीठ दिले, ग्रामीण भागातील लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनात नाट्यकलेविषयीची आवड जिवंत ठेवली. ही परंपरा अखंडितपणे पुढे नेण्यासाठी कलाकार, नाट्यसंस्था, आयोजक आणि रसिक प्रेक्षक यांच्यातील नाते अधिक दृढ राहणे अत्यावश्यक आहे.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, एका बाजूला शेतकरी आर्थिक संकटाशी झुंज देत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या प्रतिसादावर बहरणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीसमोरही प्रेक्षकांच्या उपस्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे.
म्हणूनच हा प्रश्न केवळ नाट्यसंस्थांचा किंवा कलावंतांच्या उत्पन्नाचा नाही; तर ग्रामीण समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या भवितव्याचाही आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट, तर झाडीपट्टी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या दुष्काळाची चाहूल!
कारण रंगभूमी कितीही समृद्ध असली, तरी तिला जिवंत ठेवण्यासाठी रसिकांची साथ आवश्यक असते. प्रेक्षकांची उपस्थिती, त्यांची दाद आणि त्यांच्या मनातील कलेविषयीची आस्था यांवरच झाडीपट्टी रंगभूमीचे वैभव अवलंबून आहे.
कलाकारांची कला आणि प्रेक्षकांची साथ यांचा संगम टिकला, तरच झाडीपट्टी रंगभूमीचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होऊ शकेल!




