“बैलपोळ्यात ‘चंदा चोर’ बैलजोडीची एन्ट्री; मौद्यात धार्मिक-राजकीय संदेशावरून खळबळ”
मौदा (प्रतिनिधी):
राज्यभर बैलपोळ्याचा सण पारंपरिक उत्साहात साजरा होत असताना मौदा तालुक्यात मात्र यंदा एका वेगळ्याच कारणामुळे वातावरण चर्चेत आले आहे. ‘चंदा चोर’ या नावाने सादर करण्यात आलेल्या बैलजोडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यामधील प्रतीकात्मक मांडणीमुळे धार्मिक व राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
या बैलजोडीवर कोरलेल्या चित्रांमध्ये पंडित पळताना दाखविण्यात आल्याचे दिसून येते, तर काळ्या रंगात मंदिराची प्रतिकात्मक आकृती दर्शविण्यात आली होती. त्यावर “जय श्रीराम, चंदा चोर” असा मजकूर लिहिण्यात आल्याने काहींनी यामधून सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचा अर्थ लावला आहे.
नगरपंचायत मौदाचे उपनगराध्यक्ष शुभम तिघरे यांनी या बैलजोडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती समोर आली आहे. ते काँग्रेस गटाशी संबंधित असल्याने या उपक्रमामागे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. उपनगराध्यक्षांसह काही नगरसेवकांनी पोळा सणाला प्रतीकात्मक राजकीय स्वरूप दिल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
या सादरीकरणावर नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानत समर्थन केले, तर धार्मिक आस्था असणाऱ्या तसेच सत्ताधारी पक्ष समर्थक नागरिकांनी मंदिर व श्रद्धेशी संबंधित प्रतीकांचा वापर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “धार्मिक स्थळांतील चंदा व्यवस्थापनासारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असला, तरी अशा प्रकारची मांडणी योग्य आहे का?” असा प्रश्नही काहींकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मंदिरातील देणगी व्यवस्थेबाबत जनतेत अस्वस्थता असल्याचेही काहींचे मत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मौद्यातील बैलपोळा सण केवळ पारंपरिक उत्सव न राहता सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.




