नागपूरचे डॉ. हर्षवर्धन आर्य यांना इटलीतील आंतरराष्ट्रीय कॉनोमेट्रिक परिषदेत व्याख्यानासाठी निमंत्रण
जगभरातील ३० निवडक इम्प्लांट तज्ज्ञांमध्ये नागपूरच्या डॉक्टरांचा समावेश
नागपूर : शहरातील प्रसिद्ध प्रोस्थोडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. हर्षवर्धन आर्य यांना नुकत्याच इटलीतील बोलोनिया येथे आयोजित सहाव्या कॉनोमेट्रिक वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपले संशोधन व वैद्यकीय कार्य सादर करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले. जगभरातील केवळ ३० निवडक इम्प्लांट तज्ज्ञांना या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये नागपूरचे डॉ. हर्षवर्धन आर्य यांचा समावेश होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. मार्को डिगिडी आणि डॉ. आंद्रेया टेडेस्को यांनी अध्यक्षस्थान भूषविले. दोघेही दंत इम्प्लांट उपचार क्षेत्रातील जागतिक स्तरावर ख्यातनाम तज्ज्ञ, संशोधक, विचारवंत आणि नव्या तंत्रज्ञानाचे संशोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या क्लिनिकल संशोधन आणि योगदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे.
कॉनोमेट्रिक तंत्रज्ञान हे दंत इम्प्लांटवर कृत्रिम दात किंवा दातांची संरचना सुरक्षितपणे बसविण्यासाठी वापरले जाणारे एक आधुनिक, प्रभावी आणि सुबक तंत्र आहे. या तंत्रामुळे कृत्रिम दात सहज बसविणे तसेच गरजेनुसार काढणे शक्य होते. त्यामुळे रुग्णांना उपचारादरम्यान होणाऱ्या अनेक अडचणी आणि संभाव्य गुंतागुंत कमी करण्यास मदत होते. आधुनिक इम्प्लांट उपचारांमध्ये या तंत्राला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
डॉ. हर्षवर्धन आर्य गेल्या २५ वर्षांपासून नागपूरमध्ये खासगी वैद्यकीय सेवा देत असून, दंत उपचार क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन उपचार पद्धती शहरात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. डिजिटल स्कॅनिंगच्या माध्यमातून एकाच दिवसात दात तयार करून बसविण्याच्या क्रांतिकारी उपचार पद्धतीचा नागपूरमध्ये प्रथम परिचय त्यांनी करून दिला. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते देशातील ज्ञानवंत मार्गदर्शक (नॉलेज ओपिनियन लीडर) म्हणूनही कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित परिषदेत डॉ. आर्य यांनी केलेले सादरीकरण नागपूरच्या दंतवैद्यकीय क्षेत्रासाठी गौरवाची बाब असून, त्यांच्या २५ वर्षांच्या वैद्यकीय प्रवासातील आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाभिमुख कार्याला मिळालेली जागतिक पातळीवरील मान्यता म्हणून याकडे पाहिले जात आहे.




